Thursday, November 12, 2020

भक्ति व भक्त

 


परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग. 
परमात्म्याची ज्याने ओळख होते ते ज्ञान. अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबरच होय. 
परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही. भक्ति केल्यानेच तो ओळखता येईल.
जसे गाय आली म्हणजे तिच्या मागोमाग वासरू येते, त्याला निराळे बोलवावे लागत नाही. त्याप्रमाणे, भक्ति केल्यावर ज्ञान आपोआपच मागे येते. 
आता भक्ति कशी करायची हे पाहिले पाहिजे. जो देवापासून विभक्त राहात नाही तो भक्त.
नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही, तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवील त्या स्थितीतच आनंदाने राहणे म्हणजे वैरागी होणे. सुखात ठेवले तर आसक्तिशिवाय राहिले म्हणजे झाले. 
वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही. साधुसंत प्रपंच सोडून राहात नाहीत. किंबहुना, ते आपल्यापेक्षांही प्रपंच उत्तम करतात; पण मनातून त्यांना त्यात आसक्ति नसते. 
मनाने आतून जो आसक्तिरहित झाला त्यालाच खरे वैराग्य आले असे होते.
अंगाला राख फासून राहिले म्हणजे वैराग्य येत नाही; तर देह प्रारब्धावर, भगवंताच्या भरवंशावर टाकून राहणे हेच वैराग्य. कशाचीही हाव न धरता, जी स्थिती प्राप्त होईल तीतच आनंदाने राहणे म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणे होय. आणि तसे राहिले म्हणजे आपोआपच भक्त होतो. तसे व्हायला राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणे.
नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासाने घेत जावे.
गुरूने जे नामस्मरण करायला सांगितले असेल तेच करीत राहावे. आणि त्यातच त्याला पाहावे, म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागते. असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरू दिसू लागतो; चांगल्या दिवाणखान्यात असलो म्हणजे गुरू दिसतो आणि वाईट ठिकाणी असलो तर तो दिसत नाही असे नाही. सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावर जगात वाईट असे काहीच राहात नाही, कारण मग वाईटाला जागाच राहात नाही. 
नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही तेच आहे. दुसर्या कुणीही काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नये. नामस्मरण हेच सत्य. त्यावर इतका विश्वास ठेवा, की त्याशिवाय जगात दुसरे काही नाही. एवढा विश्वास अंगी बाणल्यावर देव काही लांब नाही, तुमच्याजवळ आहे. 
प्रपंचावर जी आसक्ति करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा, म्हणजे परमार्थ कठीण नाही. 
गुरूला अनन्य शरण जाणे म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणे होय. मीपणा समूळ मेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही. मीपणा हा गुरूने सांगितलेले नामस्मरण करीत राहिल्याने जातो. म्हणूनच सतत नामस्मरण करीत असावे.
३१६. वैराग्य हे वृत्तीत असते. भगवंताने जे दिले त्यात समाधान असून, इतर काही हवे असे न वाटणे, हे वैराग्य.